अभिनेता अक्षय कुमार आपल्या एका जाहिरातीमुळे चांगलाच वादात अडकला आहे. निरमा पावडरची ही जाहिरात असून या जाहिरातीत शिवाजी महाराज व त्यांच्या मावळ्यांचा अपमान केला असल्याचा आरोप शिवप्रेमी अक्षय कुमारवर करीत आहेत. ‘अक्षय कुमारची ही जाहिरात अतिशय निंदास्पद असून यावर त्याने माफी मागायला हवी’ अशी मागणी शिवप्रेमी करीत आहेत.
या जाहिरातीत अक्षय कुमार व इतर कलाकार लढाई जिंकून राजमहालात येतात. राजमहालात त्यांचं जंगी स्वागत होतं औक्षण होतं मात्र जाहिरातीत दाखवलेली अक्षय कुमार याची पत्नी मावळ्यांच्या पराक्रमावर खुश नसून त्यांचे कपडे मळाले म्हणून दुःखी असते. यावर अक्षय कुमार म्हणतो, “महाराज की सेना दुश्मनोंको धोना जानती हैं और अपने कपडे भी!” आणि मग अक्षय कुमारसह मावळ्यांच्या वेशातील सर्व सहकलाकार कपडे धुवायला लागतात. यावर नेटकरी आपला संताप सोशल मीडियावर व्यक्त करीत असून समाजकार्य करणाऱ्या अक्षय कुमार कडून पैशांसाठी असं काही करेल अशी अपेक्षा नव्हती असं शिवप्रेमी म्हणत आहेत.