मोठा चाहतावर्ग असलेला आमिर खान आपल्या प्रत्येक चित्रपटात उत्कृष्ट वेशभूषा व अभिनय करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतो. आजवर त्याचे जवळपास सर्वच चित्रपट हिट झाले आहेत. असा हा चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता आमिर खान त्याच्या आगामी चित्रपटात ३ वेगवेगळ्या वेशभूषा साकारतांना दिसणार आहे. ‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ या चित्रपटानंतर तब्बल दोन वर्षांनी आमिर खान पडद्यावर दिसणार आहे. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला गेली आहे.
‘लाल सिंग चढ्ढा’ या आगामी चित्रपटात आमिर खान अगदी टोकाच्या तीन वेशभूषा साकारणार आहे. लोकमतच्या रिपोर्टनुसार या चित्रपटाचे शूटिंग चालू असल्याने काही दिवसांपासून तो लांब दाढीत दिसत होता. तसेच चित्रपटाच्या शूटिंगसाठी तो पंजाबमध्ये गेला असून सरदारजीच्या लूकमध्ये दिसून येत आहे. त्याच्या या सर्व लुक्सचे प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार लाल सिंग चढ्ढा हा चित्रपट १९९४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ऑस्कर विजेत्या फॉरेस्ट गम्प या चित्रपटाचा रिमेक असणार आहे. या चित्रपटात बऱ्याच ऐतिहासिक घटना दाखवण्यात येणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अद्वैत चंदन करत असून आमिर सोबत करीना कपूरही या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी ख्रिसमसला प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले जात आहे.