बॉलिवूड तसेच मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक निशिकांत कामत यांचे वयाच्या ५०व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले आहे. गेल्या १ ऑगस्ट पासून ते व्हेंटिलेटरवर होते. परंतु उपचारादरम्यान आज दिनांक १७ ऑगस्टला ४ वाजून २४ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आश्चर्याची बाब म्हणजे आज १२ वाजेच्या सुमारास अनेक वृत्तवाहिन्यांनी निशिकांत कामत यांच्या निधनाच्याबातम्या प्रसारित केल्या होत्या व त्यांना श्रद्धांजली वाहिली होती. मात्र तेव्हा ते व्हेंटिलेटरवर असून अजून जिवंत आहेत असा खुलासा हैद्राबादच्या एआयजी रुग्णालयाने तसेच अभिनेता रितेश देशमुख याने त्याच्या ट्विटमध्ये केला होता.
निशिकांत यांना लिवर सिरोसिस नावाचा गंभीर आजार झाला होता व गेल्या ३१ जुलै पासून ते हैदराबाद येथील एआयजी रुग्णालयात उपचार घेत होते. याच रुग्णालयात त्यांचे आज निधन झाले. निशिकांत कामत यांनी दृश्यम, लय भारी, मदारी अशा हिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते. त्यांच्या निधनाच्या वार्तेनंतर अनेक अभिनेत्यांनी ट्विट करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.