देशावर असलेल्या कोरोनाचं संकट पाहता लॉकडाउनच्या कालावधीमध्ये वाढ करण्यात आली आणि त्यामुळे या काळात रेल्वे प्रशासनाने देखील ०३ मे पर्यंत सर्व प्रकारच्या रेल्वे गाड्या बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
वांद्रे पश्चिम येथे मात्र हजारोंच्या जमावाने हा लॉकडाउन झुगारुन वांद्रे रेल्वे स्थानकाजवळ स्थानकावर मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. या प्रकरणावर सध्या मुंबईतील वातावरण अतिशय तापलं असून कोणत्याही अफवांना बळी पडू नका, असं वारंवार सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर दिग्दर्शक आणि अभिनेता प्रवीण तरडे याने देखील त्याची भूमिका मांडत लोकांना आवाहन केलं आहे.
“देशाचा सगळ्यात मोठा शत्रु कोरोना नाही तर अफवा पसरवणारी भूतं आहेत.त्यांच्या पासून लांब राहा”,असं ट्विट प्रवीण तरडे यांनी करत अफवांवर विश्वास ठेवू नका असं सांगितलं आहे. दरम्यान, ट्रेन सुरु होणार असल्याची अफवा नागरिकांमध्ये पसरली होती. त्यामुळे हजारोंच्या जमावाने वांद्रे स्थानकात मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.