Home मनोरंजन महेश मांजरेकरांना खंडणीसाठी धमकवणारा गँगस्टर टोळीतील नसून निघाला एक चहाविक्रेता!

महेश मांजरेकरांना खंडणीसाठी धमकवणारा गँगस्टर टोळीतील नसून निघाला एक चहाविक्रेता!

0

काल २७ ऑगस्टला मराठी चित्रपटसृष्टी तसेच बॉलिवूडधील ज्येष्ठ कलाकार महेश मांजरेकर यांना ३५ कोटी रुपये खंडणी मागण्यासाठी एका अज्ञात इसमाचा फोन आला होता. या इसमाला पोलिसांनी अवघ्या ३ – ४ तासांत ताब्यात घेतले. हा इसम गँगस्टर अबू सालेमच्या टोळीचा सदस्य असल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र तो केवळ एक चहाविक्रेता असल्याचे चौकशीमधून समोर आले.

मीडिया रिपोर्टनुसार मिलिंद तुळसकर असे नाव असलेला हा व्यक्ती ठाणे जिल्ह्यात चहाची टपरी चालवायचा. मात्र लोकडाऊन मुळे त्याचा धंदा बंद झाला व त्याला रत्नागिरीतील आपल्या गावी परतावे लागले. तेथे कमाईचे कोणतेही साधन नसल्याने तो युट्युबवर पैसे कमावण्यासाठी मार्ग शोधत होता. त्यातूनच त्याला खंडणी मागून पैसे मिळवण्याची आयडिया आली. मग त्याने युट्युबवरून अबू सालेमबद्दल माहिती मिळवली. नंतर महेश मांजरेकर यांचा संपर्क क्रमांक शोधून काढला व त्यांना अबू सालेमच्या नावाने मेसेज पाठवला ज्यात त्याने ३५ कोटींच्या खंडणीची मागणी केली. त्यानंतर त्याने धमकी देण्यासाठी मांजरेकरांना कॉल्स देखील केले आणि नंतर फोन बंद करून ठेवला. मात्र मुंबई पोलिसांना काही वेळातच त्याला शोधण्यात यश आले. त्यानंतर केलेल्या चौकशीतून समजले की तो एक चहाविक्रेता असून गँगस्टर टोळीशी तसेच अबू सालेमशी त्याचा काहीही संबंध नाही. या गुन्ह्यासाठी कोर्टाने त्याला २ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

या कामगिरीसाठी महेश मांजरेकरांनी ट्विट करून मुंबई पोलिसांचे आभार मानले।