लॉकडाउनमुळे मुंबईमध्ये विविध ठिकाणी अडकून पडलेल्या श्रमिकांसाठी अभिनेता सोनू सूद देवदूत बनून पुढे आला असला तरी त्याच्या या कामावरून सध्या राजकारण सुद्धा पेट घेत आहे. सोनू सूद हा भाजपसाठी काम करत असल्याचा गंभीर आरोप कॉंग्रेस समर्थतकांकडून करण्यात येत आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात योग्य ते काम सुरू असून भाजप सोनू सूदचा वापर करुन ठाकरे सरकारची प्रतिमा मलिन करत करत असल्याचंही कॉंग्रेसनं म्हटलं आहे. तसेच शिवसेनेचे मुखपत्र सामना मधून सुद्धा सोनू सूद वर गंभीर आरोप करण्यात येत आहेत.
काही दिवसांपूर्वी सोनूनं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची सदिच्छा भेट घेतली होती. या भेटीनंतरच अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. सोनू हा भाजपाचा एजंट असल्याचंही अनेकांनी म्हटलं आहे. काही दिवसातंच सोनू भाजपमध्ये प्रवेशही करेल अशा आशयाच्या पोस्ट कॉंग्रेस समर्थकांकडून सोशल मीडियावर शेअर करण्यात येत होत्या. परंतु या सर्व अफवा असल्याचं सोनूनं स्पष्ट केलं आहे. राजकारणात काही मात्र रस नसल्याचंही त्यानं म्हटलं आहे. एका मुलाखतीत सोनू सूदनं स्पष्ट केलं की, ‘मी राजकारणात असतो तर कदाचित आता जे काही करतोय ते मोकळेपणानं करू शकलो नसतो. मी सध्या जे करतोय त्यात खूश आहे. माझ्या अभिनय कारकिर्दीमध्ये मी खूश आहे. ल्या दहा वर्षांपासून मला अनेक राजकीय पक्षांकडून ऑफर्स आल्या. पण, मला राजकारणात जाण्यात रस नाही.’
या सर्व आरोपानंतर सोनू सूद ने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे, मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सोनू च्या कामासाठी कौतुकाची थाप दिली आहे. दरम्यान रोहित पवार यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत सोनू सूदची भेट घेतल्याचं म्हटलं आहे. ‘घर जाना हैं’, हे स्थलांतरित मजुरांचे केवळ तीन शब्द ऐकून हजारो मजुरांना स्वगृही सुखरुप पोचवणाऱ्या यांची आज त्यांच्या घरी भेट घेतली, असं ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे.सोनूचे हे काम निश्चितच कौतुकास्पद आहे. या कोरोनाकाळात त्याच्या या दिलदारीची रोहित पवार यांनी भरभरुन प्रशंसा केली आहे.