Home मनोरंजन सुशांत-श्रद्धाच्या ‘छिछोरे’ची ७ दिवसांत जवळपास ७० कोटींची कमाई!

सुशांत-श्रद्धाच्या ‘छिछोरे’ची ७ दिवसांत जवळपास ७० कोटींची कमाई!

0

दंगल सारखा सुपरहिट सिनेमा देणारे नितेश तिवारी यांच्या दिग्दर्शनाखाली झालेला ‘छिछोरे’ सिनेमा बॉलिवूडमध्ये सध्या चांगलाच गाजत आहे. ६ सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने ७ दिवसांत तब्बल ६८.८३ कोटींची कमाई केली आहे. कॉलेज लाईफवर आधारित असलेल्या या चित्रपटाला सर्व वयोगटांतून उत्तम-उत्तम प्रतिसाद मिळत आहे. प्रौढांसाठी आठवणी ताज्या करणारा तर तरुण वर्गाशी जवळून जोडला जाणार इतकाच नाही तर एक चांगला संदेश देणारा हा चित्रपट ठरत आहे. त्यामुळे अनेक लोकांकडून, समीक्षकांकडून व बऱ्याच बॉलिवूड सेलिब्रिटींकडूनही सोशल मीडियावर चित्रपटाचे कौतुक केले जात आहे.

इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटातून कॉलेज लाईफ, हॉस्टेल लाईफ अगदी जवळून पाहता येते. चित्रपटाची कथा जुनीच असली तरी ती मांडण्याची पद्धत आणि सुशांत सिंग राजपूत, श्रद्धा कपूर, वरुण शर्मा, प्रतीक बब्बर यांसारख्या उत्तम कलाकारांच्या उत्कृष्ट अभिनयामुळे त्याला खूप चांगला रतीब मिळाला आहे. तरुणांसाठी ‘अपयशाने खचून जाऊ नका’ असा तर पालकवर्गासाठी ‘मुलांवर अपेक्षांचे ओझे लादू नका’ असा संदेश या चित्रपटातून देण्यात यश आले आहे असे म्हणायला हटकत नाही. 3 इडियट्स प्रमाणेच ‘छिछोरे’ देखील बराच काळ प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणार असा अंदाज वर्तवला जात आहे.