कोरोना प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर BSNL अर्थात भारत संचार निगम लिमिटेड या भारत सरकारच्या टेलिकॉम कंपनीतील तब्बल २०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा निर्णय झाला आहे. मीडिया न्यूजनुसार या कर्मचाऱ्यांना मागील वर्षभरापासून पगारही मिळालेला नव्हता. अशातच इतक्या लोकांच्या नोकऱ्या आता जाणार असल्याचे कळते आहे.
याशिवाय कर्मचारी संघटनेच्या माहितीनुसार मागील १४ महिन्यांपासून पगार न झाल्याने कित्येक कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत.गेल्या १ सप्टेंबरला सुरक्षा आणि सफाई कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचे आणि मुख्य व्यवस्थापकांच्या खर्चात कपात करण्याचे आदेश बीएसएनएलच्या HR ने दिले होते. या सर्व परिस्थितीवरून लक्षात येते की बीएसएनएल कंपनीची आर्थिक स्थिती चांगलीच खालावलेली आहे.