Home अर्थजगत घरांच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत पाच टक्क्यांची वाढ.

घरांच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत पाच टक्क्यांची वाढ.

0

प्राईम नेटवर्क : केंद्र सरकारने घरबांधणी उद्योगाला दिलेले प्रोत्साहन, परवडणाऱ्या घरांसाठी दिलेल्या सवलती, बांधकाम आणि रिअल इस्टेट क्षेत्राला मिळालेली उभारी यांमुळे चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीअखेर घरांच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत पाच टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसून आले आहे. हा कल प्रामुख्याने देशातील प्रथम श्रेणीच्या आणि विशेषत: दाक्षिणात्य शहरांमध्ये दिसून आला आहे. परवडणाऱ्या घरांची संख्या वाढल्याने विक्रीत वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

तिसऱ्या तिमाहीअखेर घरांची विक्री वाढून ६९,८८६वर पोहोचली आहे, असे मुंबईस्थित रिअल इस्टेट रेटिंग आणि रिसर्च कंपनी ‘लायसेस फोरस’च्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ६५,५२० घरांची विक्री झाली होती.

‘पन्नास लाख रुपयांच्या आसपास किंमती असलेल्या घरांच्या विक्रीतील वाढ तिसऱ्या तिमाहीअखेर ५३% इतकी आहे. त्या तुलनेत २५ लाख रुपयांपासून ते ५० लाख रुपयांपर्यंत किमती असणाऱ्या घरांच्या विक्रीत वार्षिक आधारावर १२ टक्क्यांची वाढ आहे. या उलट अल्ट्रा लक्झरी सेंगमेंटमधील घरांच्या विक्रीत गेल्या तिमाहीच्या तुलनेत सहा टक्क्यांची, तर वार्षिक आधारावर १८% घट नोंदवण्यात आली आहे, अशी माहिती ‘लायसेस फोरस’चे व्यवस्थापकीय संचालक पंकज कपूर यांनी दिली.सर्वाधिक न विकलेल्या घरांमध्ये कोलकात्ता त्यापाठोपाठ हैदराबाद आणि चेन्नईचा क्रमांक लागतो.

गेल्या वर्षभरात नव्या गृहनिर्माण प्रकल्पांच्या संख्येत ८१ टक्के घट नोंदवण्यात आली. या वर्षभरात केवळ २,११,५०२ युनिट घरांची विक्री झाली. घरांच्या विक्रीत २०१७मध्ये घट झाल्याने बांधकाम व्यावसायिकांनी नव्या प्रकल्पांच्या उभारणीत हात आखडता घेतल्याचे दिसून आले. अन्य शहरांच्या तुलनेत बेंगळुरू, हैदराबाद आणि पुण्यात मात्र मोठ्या प्रमाणावर नव्या प्रकल्पांची घोषणा झाल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.