Home अर्थजगत देशभरात लॉकडाउन ३ मे पर्यंत कायम राहणार : पंतप्रधान नरेंद्र मोदी

देशभरात लॉकडाउन ३ मे पर्यंत कायम राहणार : पंतप्रधान नरेंद्र मोदी

0

देशात लागू असलेला लॉकडाउन आपण ३ मेपर्यंत वाढवत असल्याची मोठी घोषणा देशाचे पंतप्रधान मोदींनी केली आहे. राज्य सरकारांनी, स्थानिक स्वराज्य संस्थांनी अतिशय उत्तम काम केलं आहे. प्रत्येकानं जबाबदारी ओळखून योगदान दिलं आहे. मात्र तरीसुद्धा कोरोना पसरतोचं आहे. कमीत कमी नुकसान व्हावं, लोकांच्या अडचणी कशा कमी करता येतील यासाठी राज्यांसोबत चर्चा केली. काही राज्यांनी लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतल्याची घोषणा मोदींनी केली. 

योग्य वेळी घेण्यात आलेल्या निर्णयांमुळे, लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगमुळे आपली स्थिती बलाढ्य देशांच्या तुलनेत अतिशय चांगली असल्याचं मोदी म्हणाले. 
आपली तुलना कोणत्याही देशासोबत करणं योग्य ठरणार नाही. पण जगामधील बलाढ्य देशांची सद्यस्तिथी पाहता आपण अतिशय चांगल्या स्थितीत आहोत. महिना दीड महिन्यापूर्वी बरेचसे देश आपल्या बरोबरीत होते. मात्र आत्ता तिथे कोरोनाचे रुग्ण २५ ते ३० पट आहेत. मृतांचा आकडा अगदी हजारोंच्या घरात आहे. आपण योग्य वेळी निर्णय घेतले नसते, तर आपली स्थिती काय असली असती, याची कल्पनासुद्धा करवत नाही. मागील दिवसांमधील स्थिती पाहिल्यास, आपण जे केलंय ते योग्य होतं याची मनापासून खात्री पटते. लॉकडाऊन, सोशल डिस्टन्सिंगचा फायदा देशाला झाला. त्याची आर्थिक किंमत सुद्धा आपण चुकवली. पण देशाच्या नागरिकांच्या जीवापुढे ती किंमत काही एक नाही. अतिशय कमी संसाधनं असताना सुद्धा आपण उत्तम कामगिरी केली. त्याची जगभरात चर्चा होत आहे, अशा शब्दांत मोदींनी देशवासीयांनी दाखवलेल्या अतुलनीय संयमाचं कौतुक केलं.

कोरोनाविरुद्धच्या लढ्यात एकजुटीनं लढत असल्याचं म्हणत हीच बाबासाहेब आंबेडकरांना वाहिलेली खरी श्रद्धांजली आहे, असं सुद्धा पंतप्रधान म्हणाले.