Home अर्थजगत आरबीआयने वाढवली पीएमसी बँकेतून पैसे काढण्याची मर्यादा; खातेदारांना दिलासा

आरबीआयने वाढवली पीएमसी बँकेतून पैसे काढण्याची मर्यादा; खातेदारांना दिलासा

0

गेल्या काही दिवसांपूर्वी आरबीआयने पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकांवर (PMC) ६ महिन्यांसाठी निर्बंध लावले हे आपण ऐकलेच असेल. त्यावेळी खातेदारांना बँकेतून पैसे काढण्याची मर्यादा केवळ एक हजार रुपये इतकी निश्चित करण्यात आली होती. मात्र त्यामुळे खातेदारांना बऱ्याच अडचणी येत होत्या व अनेक अनपेक्षित घटना घडत होत्या. त्यामुळे आरबीआयने बँकेतून पैसे काढण्याची मर्यादा ४० हजारापर्यंत वाढवली आहे असे मीडिया न्यूजवरून समजले.

भारतीय रिसर्व बँकेने २३ सप्टेंबरला पीएमसी बँकेवर निर्बंध लावले तेव्हा खातेदारांना बँकेतून केवळ एक हजार रुपये काढता आले. त्यामुळे पैशांअभावी खातेदारांच्या अडचणी वाढत असलेल्या पाहून आरबीआयने २६ सप्टेंबरला पैसे काढण्याची मर्यादा १० हजारांपर्यंत वाढवली. तरीही खातेदारांनी ही मर्यादा अजून वाढवण्यासाठी मागणी केली. त्यानंतर ३ ऑक्टोबरला ही मर्यादा वाढवून २५,००० रुपये करण्यात आली. मात्र तरीही खातेदार नाखूष असल्याने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांची भेट घेतली व त्यांना खातेदारांना होणाऱ्या गैरसोयीवर मार्ग काढण्याची विनंती केली. त्यांच्या विनंतीला मान देऊन आरबीआयने आज पैसे काढण्याची मर्यादा ४० हजारांपर्यंत वाढवली. त्यामुळे खातेदारांना तात्पुरता तरी दिलासा मिळाला आहे.