कोरोना लॉकडाऊन मुळे अनेक अडचणी येत परीक्षांचा निकाल कधी लागतो याची वाट बघणाऱ्या विद्यार्थ्यांची कालपासून शुद्ध फसवणूक होत आहे. बारावीचा निकाल जाहीर झाला असून खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा असा बनावट संदेश सोशल मीडियाच्या माध्यमात प्रचंड व्हायरल होत आहे आणि अनेक लोक त्या बनावट संदेश आणि वेबसाईटवर विश्वास ठेवून क्लिक करतात, प्रत्यक्षात मात्र तिथे कुठलाही निकाल लावला गेला नसून ही फक्त वेबसाईटवर ट्राफिक गोळा करण्यासाठी केली गेलेली युक्ती आहे असे समजते.
व्हायरल झालेल्या वेबसाईटची लिंक खालीलप्रमाणे आहे,
https://mahresult-nic-in-home.herokuapp.com/
या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये किती टक्के गुण मिळत असले तरी त्यांना गुणपत्रिकेसाठी मेल करण्यात यावा असा मेसेज दाखवण्यात येत आहे. सोशल मीडियावर या वेबसाईटची लिंक मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली असल्याने विद्यार्थ्यांची दिशाभूल होत आहे.
या लिंकवर जाऊन विद्यार्थ्यांनी आपले नाव, आईचे नाव आणि आसन क्रमांक टाकल्यानंतर त्यांना उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण झाल्याचा मेसेज येतो. या मेसेजमध्ये कोविडमुळे आमच्याकडे पुरेसा कर्मचारी वर्ग नसल्याने आम्हाला सर्व डेटा उपलब्ध करण्यात अडचण येत आहे. परंतु एका आठवड्यामध्ये तुमची गुणपत्रिका तुमच्या कॉलेजकडे पाठवण्यात येईल. त्यामुळे तुम्ही कॉलेजशी संपर्क साधा. तसेच तुम्ही उत्तीर्ण झाला आहात तुमचे अभिनंदन तुम्हाला अमुक टक्के गुण मिळाले आहेत. तुम्हाला गुणपत्रिका हवी असल्यास आम्हाला मेल करावा. ऑगस्टमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहे. असा मेसेज त्यामध्ये देण्यात येतो.