मुंबईत मेट्रो कारशेडसाठी आरे कॉलनीतील वृक्षतोडीचा मुद्दा बरेच दिवस गाजला होता. यासंदर्भातील निर्णय कित्येक दिवसांपासून लांबणीवर पडला होता. त्याबद्दलचा अंतिम निकाल काल ११ ऑक्टोबरला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला. मीडिया रिपोर्टनुसार मेट्रो कारशेडच्या तीन प्रकल्पांची जागा बदलली असल्याचं मुखयमंत्र्यांनी सांगितलं. त्यानुसार मेट्रो कारशेड बांधण्यासाठी आता आरे कॉलनीऐवजी कांजूर मार्ग येथील सरकारी जमिन वापरली जाणार आहे. तसेच याआधी आरे मधील वृक्षतोडीचा विरोध करणाऱ्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे उद्धव ठाकरेंनी निर्देश दिले होते.
महाराष्ट्रातील जनतेला व्हिडिओद्वारे संबोधित करतांना मुख्यमंत्र्यांनी हि घोषणा केली. या संबोधनाचा व्हिडीओ मुख्यमंत्री महाराष्ट्र च्या ट्विटर अकाउंटवर उपलब्ध आहे.
मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय जाहीर केल्यानंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ‘Aarey Saved!’ अर्थात ‘आरे वाचवले’ असे ट्विट करत प्रतिक्रिया व्यक्त केली.