Home महाराष्ट्र बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडेंच्या स्मारकांना एमआयएमचा विरोध!

बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडेंच्या स्मारकांना एमआयएमचा विरोध!

0

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मारकासाठी राज्य सरकारच्या तिजोरीतून पैसा खर्च करण्यास एमआयएमने जाहीर विरोध केला आहे. या स्मारकांसाठी राज्य सरकारच्या तिजोरीतील निधी खर्च होणार असेल तर त्या विरोधात न्यायालयात जाऊ, असा इशारा एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी दिला आहे.औरंगाबादमध्ये ही स्मारके निर्माण करण्यासाठी १०० कोटींचा खर्च अंदाजित आहे. हा पैसा स्मारकांसाठी खर्च करण्याऐवजी आत्महत्याग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांसाठी किंवा जिल्हा परिषद शाळांच्या सुधारणेसाठी खर्च करावा, अशी मागणी यावेळी झाली. याविरोधात न्यायालयात याचिका केल्यावर स्मारकांच्या निविदांना न्यायालयाकडून स्थगिती दिली जाऊ शकते त्यामुळे होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी संबंधित कंत्राटदारांनी यात न पडलेले बरे असे जलील यावेळी म्हणाले.

“ही दोन्ही स्मारक सरकारी पैशातून उभारण्यात येणार आहे. सरकारचे कोट्यावधी रुपये स्मारकांवर खर्च करण्यास आमचा तीव्र विरोध आहे. या पैशातून चांगले रूग्णालय किंवा शैक्षणिक संस्था उभारली जावी अशी आमची भूमिका आहे. परंतु तसे न करता हा पैसा बाळासाहेब ठाकरे व गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकावर खर्च करण्यात येणार असल्यामुळेच या विरोधात न्यायालयात जाण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे” असा पुनरुच्चार इम्तियाज जलील यांनी पत्रकारांसमोर केला.