अचानकपणे आमदार पदाचा राजीनामा दिल्यापासून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार राज्यभरात चर्चेत होते. ती चर्चा थोडी शांत होत नाही तोच आणखी एका चर्चेला सुरुवात झाली आहे. मीडिया रिपोर्ट नुसार अजित पवारांचा फोन हॅक झाल्याची बातमी समोर आली आहे. सदर घटनेची मुंबईच्या सायबर क्राईम ब्रांचकडे तक्रार करण्यात आली असून तपास कार्य सुरू आहे.
मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष नरेंद्र राणे यांच्यासोबत मंगळवारी एक विलक्षण प्रकार घडला ज्यामुळे ही घटना सर्वांसमोर आली. त्यांना रविवारी सकाळी अजित पवारांच्या नंबरवरून फोन आला व कुणाल नावाच्या एका अज्ञात व्यक्तिद्वारे एका बँक खात्यावर विशिष्ट रक्कम पाठवण्याची मागणी करण्यात आली. राणेंना ही गोष्ट संशयास्पद वाटली आणि त्यांनी अजित पवारांच्या पीए ला फोन केला. पण अजित पवार तेव्हा तिथे नव्हते त्यामुळे राणेंनी परत अर्ध्या तासाने पवारांच्या नंबरवर फोन केला. तेव्हा फोन स्वतः अजित पवारांनी घेतला. तेव्हा राणेंनी त्यांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतरच्या चर्चेतून अजित पवारांनी राणेंना फोन केला नसून त्यांचा फोन त्यांच्या स्वतःकडेच असल्याचे समजले. परंतु त्याच व्यक्तीने पुन्हा एकदा राणेंना कॉल करून पैशांची व्यवस्था झाली असे सांगितले. कोण बोलताय विचारल्यावर त्या व्यक्तीने फोन कट केला असे राणेंनी सांगितले. यावरून अजित पवारांचा फोन हॅक झाला असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे नरेंद्र राणेंनी सदर घटनेची सायबर क्राईम ब्रांच मध्ये तक्रार नोंदवली असून यावर तपासणी सुरू आहे.