विधानसभा निवडणुका केवळ ३ दिवसांवर आल्या असतांना राजकीय नेत्यांसोबत बऱ्याच अनपेक्षित घटना घडत आहेत. काल रात्री कन्नड मतदारसंघातील उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्या घरावर अज्ञातांद्वारे हल्ला झाल्याची बातमी समोर आली आहे. हल्ला झाला त्यावेळी ‘जय भवानी जय शिवाजी’ अशा घोषणा हल्लेखोर करत असल्याने ते शिवसेनेचे कार्यकर्ते होते अशी शंका व्यक्त केली जात आहे.
हर्षवर्धन जाधव हे कन्नडचे माजी आमदार असून त्यांनी मराठा आरक्षणासाठी गेल्या वर्षी आमदारपदाचा राजीनामा दिला होता. यावर्षी पुन्हा ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून कन्नड मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहेत. काल दिनांक १६ ऑक्टोबरला मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास जाधव यांच्या समर्थ नगरमधील घरावर काही तरुणांनी दगडफेक केली. या हल्ल्यात जाधव यांच्या घराच्या तसेच गाडीच्या काचा फुटल्याचे समजले. गेल्या मंगळवारी चिंचोली लिंबाजी येथील प्रचारसभेत बोलतांना जाधव यांनी शिवसेनेवर तसेच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यावेळचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे शिवसैनिकांनी जाधव यांच्यावर जातीयवादाचा गुन्हा दाखल केला होता तसेच या गोष्टीला प्रत्युत्तर देण्याचा इशाराही दिला होता. त्यामुळे काल रात्रीचा हल्ला शिवसैनिकांनीच केला असावा असे बोलले जात आहे. जाधव यांच्या पत्नी अर्थात रावसाहेब दानवे यांची कन्या संजना जाधव यांनी या घटनेचा निषेध करीत शिवसेनेला समोरासमोर उत्तर देण्याचे आव्हान केले असे मीडिया न्यूजवरून समजले.