Home महाराष्ट्र भीमा कोरेगाव प्रकरणात प्रकाश आंबेडकरांच्या जावयाचा अटकपूर्व जामीन फेटाळला, पासपोर्ट सुद्धा जप्त

भीमा कोरेगाव प्रकरणात प्रकाश आंबेडकरांच्या जावयाचा अटकपूर्व जामीन फेटाळला, पासपोर्ट सुद्धा जप्त

0

पुणे येथील ‘भीमा कोरेगाव’ आणि ‘एल्गार परिषद प्रकरणा’ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने प्रकाश आंबेडकर यांचे जावई, प्रा. आनंद तेलतुंबडे आणि मानवी हक्क कार्यकर्ते गौतम नवलखा यांचा अटकपूर्व जामीन सुप्रीम कोर्टाने फेटाळला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने फेब्रुवारी महिन्यात त्यांच्या अर्ज फेटाळल्यावर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी त्यांच्या अर्जावर सुनावणी करतांंना त्यांना अटकपूर्व जामीन नाकारत तीन आठवड्याच्या आत राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच NIA समोर शरण येण्याचे आदेश दिले आहेत. सोबतच या दोघांना त्यांचे पासपोर्ट्ससुद्धा तपासयंत्रणेकडे जमा करण्यास सांगितले आहेत.ज्या ‘बेकायदा हालचाली प्रतिबंधक कायद्या’ (UAPA) अंतर्गत गुन्हे दाखल झाले होते त्या कायद्याच्या कलम 43डी (4) च्या उल्लेख करत या खंडपीठाने अटकपूर्व जामीन देणे शक्य नसल्याचे सांगितले. तेलतुंबडे आणि नवलखा यांच्यातर्फे कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी यांनी युक्तिवाद केला. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी NIA ची बाजू मांडली.

सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय आल्यानंतर गौतम नवलखा यांनी प्रेस ला दिलेल्या पत्रकात असं म्हटलं आहे की, “आता मला शरण म्हणून हजर होण्यास तीन आठवडे असताना मी एखाद्या कटाचा भाग वाटणा-या आणखी एका चाचणीतून आरोपी म्हणून मुक्त होण्याची आशा करु शकतो का? माझ्यासोबत जे इतर आरोपी आहेत त्यांना त्यांचं स्वातंत्र्य परत मिळेल का?”

पुण्याजवळील भीमा कोरेगाव येथे १ जानेवारी २०१८ रोजी दंगल झाली होती आणि त्याच दिवशी इथे लाखोंच्या संख्येने दलित समुदाय जमा होतो. या घटनेचे पडसाद देशभरात उमटले होते. या हिंसाचाराला एक दिवस अगोदर म्हणजे ३१ डिसेंबर २०१७ रोजी पुण्यात झालेल्या ‘एल्गार परिषदे’तील वक्तव्यं कारणीभूत होती अशा तक्रारीवरुन पुणे पोलिसांनी स्वतंत्र तपास सुरु केला.

या ‘एल्गार परिषदेच्या’मागे माओवादी/नक्षलवादी संघटनांचा हात होता असं म्हणत या संघटनांशी कथित संबंध आहेत या संशयावरुन पुणे पोलिसांनी देशभरातल्या विविध भागांतून डाव्या चळवळीशी संबंधित अनेक जणांना अटक केली. त्यानंतर या संशयीत असलेल्या चळवळीतल्या कार्यकर्ते, लेखक यांची न्यायालयीन लढाई सुरु झाली. आनंद तेलतुंबडे आणि गौतम नवलाखा यांची ही लढाई सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचली होती.