निवडणुका जवळ आल्या की बऱ्याच अनपेक्षित गोष्टी समोर येत असतात. येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशीच एक गोष्ट समोर आली आहे. एका भाजपच्या उमेदवाराने भर प्रचारसभेत वादग्रस्त वक्तव्य केले असून त्यामुळे राज्यभर एका नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.
भाजपचे हे उमेदवार परतूर मतदारसंघातील असून बबनराव लोणीकर असे त्यांचे नाव आहे. ते सध्या महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री असून एका प्रचारसभेत बोलतांना लोणीकरांची जीभ घसरली आणि ‘मी सगळ्यांना पैसे वाटले आहेत म्हणून या निवडणुकीची मला काही भीती वाटत नाही’ असे विधान त्यांनी केले. तसेच सगळ्यांना मोदींजींची रॅली जॉईन करण्याचे आवाहनही त्यावेळी त्यांनी केले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत असून निवडणूक आयोग यावर काय भूमिका घेणार यावर सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.