Home महाराष्ट्र भाजप-शिवसेना युती अखेर निश्चित! जागावाटप अजूनही टांगणीला

भाजप-शिवसेना युती अखेर निश्चित! जागावाटप अजूनही टांगणीला

0

बऱ्याच दिवसांपासून राज्यभरातील जनतेला आशेवर ठेवलेल्या भाजप-सेना युतीचा निर्णय अखेर आज पक्का झाला आहे. विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या नंतरही बरेच दिवस दोन्ही पक्षांत जागावाटपावरून मतभेद असल्यामुळे युती होणार की नाही अशी चर्चा सगळीकडे चालू होती. पण शेवटी आज भाजप व शिवसेनेने एक संयुक्त पत्रक काढून युतीची घोषणा केली.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेना नेते सुभाष देसाई या दोघांच्या स्वाक्षरी असलेले हे पत्रक मुख्यमंत्र्यांच्या एका कार्यक्रमात जाहीर करण्यात आलं असे मीडिया न्यूज वरून समजले. युतीचे गणित जरी एकदाचे जुळून आले असले तरी कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत याचा उलगडा अजून झालेला नसून याबद्दलची माहिती लवकरच समोर येईल असे या पत्रकात नमूद केले आहे.

भाजप आणि शिवसेनेशिवाय अनेक मित्रपक्षांचाही युतीमध्ये समावेश आहे. यामध्ये रिपाइं, रासपा, शिवसंग्राम, आरपीआय, रयतक्रांती संघटना हे पक्ष आहेत. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच युतीची घोषणा करतील असे एका वृत्तावरून समजले. बऱ्याच दिवसांपासून टांगणीला असलेला हा निर्णय एकदाचा मार्गी लागल्यामुळे अफवांना तसेच लोकांच्या उत्सुकतेला पूर्णविराम मिळाला आहे.