सर्व काही पुन्हा सुरु होत असतांना मंदिरे उघडण्याची मागणी राज्यभर सुरु आहे. मात्र सरकार यावर कुठलीच प्रतिक्रिया देत नसल्याने भाजपने आता पवित्रा घेतला आहे. तुळजापूर येथील भवानी मंदिर परिसरात मंदिरे पुन्हा खुली करण्याच्या मागणीसाठी भाजपच्या आध्यात्मिक आघाडीने बेमुदत ठिय्या आंदोलन पुकारले आहे. काल ५ नोव्हेंबरपासून भाजपचे हे आंदोलन सुरु असून परिणामी या परिसरात आता कलम १४४ अर्थात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच अध्यात्मिक समितीने मंदिरासमोर उभारलेला मंडप स्थानिक प्रशासनाने हटवला.
भाजप अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरु आहे. जमावबंदी लागू झाल्यानंतर तुषार भोसले यांना स्थानिक प्रशासनाकडून नोटीस देण्यात आली असून मंदिराच्या ३०० मीटरच्या परिघापर्यंत हे आंदोलन करता येणार नाही असे या नोटीसमध्ये सांगितले आहे. यावर तुषार भोसले यांनी आयोजित केलेला महाचंडी यज्ञ ते पूर्ण करणारच असल्याचे त्यांनी प्रशासनाला बजावले. त्यामुळे येथे संघर्ष होण्याची शक्यता असल्याचे मीडिया न्यूजमधून सांगण्यात येत आहे.