Home महाराष्ट्र नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसी विरोधात काँग्रेसचा सत्याग्रह; महाराष्ट्रात हा कायदा लागू...

नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसी विरोधात काँग्रेसचा सत्याग्रह; महाराष्ट्रात हा कायदा लागू होणार नाही अशी बाळासाहेब थोरातांची घोषणा

0

नागरिकत्व दुरुस्ती आणि नोंदणी कायद्याला विरोध दर्शवण्यासाठी काँग्रेसने काल अर्थात सोमवारी महात्मा गांधींचे समाधीस्थळ राजघाट येथे सत्याग्रह केला. दुपारच्या तीन वाजेपासून रात्रीच्या आठ पर्यंत असे पाच तास हा सत्याग्रह चालू होता. त्यावेळी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, मनमोहन सिंग, राहुल गांधी, प्रियांका गांधी, अहमद पटेल, गुलाम नबी आझाद तसेच अनेक राज्यांतील काँग्रेसचे मुख्यमंत्री व वरीष्ठ नेते या सत्याग्रहात सहभागी झाले होते.

या सत्याग्रहाला उपस्थित असलेले महाराष्ट्राचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी ‘महाराष्ट्रात CAA NRC लागू होणार नाही’ अशी शपथ घेतली. त्यावेळी बोलतांना थोरात म्हणाले, “महाराष्ट्र कायमच धर्मनिरपेक्ष विचारधारेचं राज्य राहिलं आहे. महाराष्ट्राने स्वतःला कधीही जात आणि धर्माच्या नावावर विभाजित होऊ दिलं नाही. महाराष्ट्र आजही या संविधान बचावाच्या लढाईत न्यायासोबत, सत्यासोबत ठामपणे उभा आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीच्या माध्यमातून भारताच्या आत्म्याला ठेच पोहोचणार आहे. सीएए हा कायदा भेदभाव करणारा आहे, त्यामुळे आम्ही भाजपाची ही असंविधानिक वागणूक सहन करणार नाही. महाराष्ट्रात नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसी लागू होणार नाही.” याशिवाय मराठी जनतेच्या वतीने नागरिकत्व कायद्याला विरोध व्यक्त करण्यासाठी थोरात यांनी भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेचे मराठी भाषेतून वाचन केले.