भाजप कोअर कमिटीची नुकतीच बैठक झाली असून या बैठकीत आसा निर्णय घेण्यात आला आहे की भाजप प्रदेशाध्यक्ष बदलण्यात येणार असून नवीन प्रदेशाध्यक्षाची घोषणा 31 डिसेंबर रोजी करण्यात येणार आहे. भाजपचे नेते आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली आहे.
भाजपच्या या निर्णयाने चंद्रकांत पाटील यांना मोठा धक्का बसणार आहे. मुनगंटीवार यांनी माहिती दिली की, “जनादेश हा महायुतीला मिळाला असून, महायुतीचेच सरकार महाराष्ट्रात सत्तेत येणार आहे. उद्या आम्ही राज्यापालांना भेटणार असून सत्तास्थापनेबाबत चर्चा करणार आहोत. चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही राज्यपालांना मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणून भेटणार असून आमचं प्रत्येक पाऊल हे सत्तास्थापनासाठीच असणार आहे”
त्याचबरोबर मुनगंटीवार म्हणाले की, “राष्ट्रीय पातळीवर याबाबत निर्णय झाला असून यावेळी पक्षाध्यक्ष बदलला जातो. तसेच, 91 हजार बूथ अध्यक्षांचीही निवड होईल, भाजप जिल्हाध्यक्षांचीही निवड प्रक्रिया पूर्ण केली जाईल.” दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याऐवजी सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील हे राज्यपालांना भेटणार असल्याने चर्चेला उधाण आले आहे.