प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष अर्थात बच्चू कडू आणि तृप्ती देसाई यांनी एकमेकांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. ‘बच्चू कडू यांची सोशल मीडियावर बदनामी केली’ असा आरोप करत तृप्ती देसाई यांच्या विरोधात बुलडाणा जिल्ह्यातील धाड पोलीस स्टेशनला प्रहारचे जिल्हाध्यक्ष वैभव मोहिते यांनी तक्रार केली. त्यामुळे पोलिसांनी तृप्ती देसाईंवर २ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल केला आहे.
मीडिया न्यूज नुसार तृप्ती देसाई यांच्या फेसबुकवरून बच्चू कडू यांच्या संदर्भात बदनामीकारक मजकूर व्हायरल करण्यात आला होता. त्यानंतर तृप्ती देसाई आणि बच्चू कडू यांच्यात फोनवर संवाद झाला. दरम्यान यांच्यात कडाक्याचे वाद झाले. बच्चू कडू यांच्याकडून त्यानंतर धमकी दिल्याची तक्रार तृप्ती देसाईंनी केली आहे. “तुम्ही मला फेसबुकवर उपदेश करू नका, स्वतःला मोठे समजू नका, अती शहाणपणा करू नका, अन्यथा तुम्हाला परिणामांना सामोरे जावे लागेल” असे शब्दप्रयोग करत बच्चू कडू यांनी धमकी दिल्याचा खुलासा तृप्ती देसाई यांनी केला आहे. आता हा वाद शिगेला जाणार की वेळीच निवळणार हे वेळचं सांगेल…