केंद्र तसेच राज्य सरकार यांनी जाहीर केलेले लॉकडाऊन झुगारत काल म्हणजेच १४ एप्रिल ,मंगळवारी रस्त्यावर उतरलेल्या परप्रांतीय मजुरांचे मोबाईल रिचार्ज संपले होते. बहुंताश मजूरांचे प्रीपेड रिचार्ज संपल्याने त्यांचा त्यांच्या घरांशी संपर्क तुटला होता. त्यामुळे घरी जाण्याच्या ओढीने जीव कासावीस झालेले हे मजूर रस्त्यावर उतरले होते,असे मत भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी मांडले आहे.
त्यांनी एक पत्र लिहत वांद्र्याच्या घटनेबाबत काही कारणे मांडली आहेत.बांद्रा येथे गोळा झालेल्या मजुरांच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे ही घटना घडल्याचा आरोप पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केला आणि भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे यांना पत्र लिहून हा आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे.
मजुरांच्या अस्वस्थतेची कारणे शेलार यांनी त्यात मांडली असून मोबाइल रिचार्ज संपणे हे त्यातले एक महत्वाचे कारण असल्याचे शेलार यांनी म्हटले आहे.
शेलार यांचा मतदारसंघ असलेल्या वांद्रे पश्चिमेला मजुरांच्या निदर्शनाचा हा प्रकार घडला होता. त्यामुळे शेलार यांनी आदित्य ठाकरे यांच्यासह महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांना लिहिलेल्या पत्रात काही गोष्टी निदर्शनास आणून दिल्या आहेत.
शेलार यांनी या पत्राद्वारे मोबाइल रिचार्जचा मुद्दा उपस्थित केलेला आहे. “बहुतांश कामगार हे प्रीपेड मोबाइल वापरतात. त्यांच्या मोबाइलचे रिचार्ज आता संपत आलेले असून मोबाइल रिचार्जची दुकाने सुरू नसल्याने व ऑनलाइन रिचार्ज करणे सर्वांनाच शक्य नसल्याने त्यांची प्रचंड कोंडी झाली आहे. गावाकडं असलेल्या कुटुंबीयांशी, नातेवाईक व मुकादमाशी त्यांचा संपर्क तुटू लागला आहे. त्यातून त्यांच्यात अस्वस्थता आहे. त्यामुळे या कामगारांसाठी मोबाइल रिचार्जची सुविधा उपलब्ध करून द्यावी” अशी मागणी शेलार यांनी पत्रात केली आहे.