Home तंत्रज्ञान ‘तुमचे व्हाट्सएप स्टेटस ३० पेक्षा जास्त लोक पाहतात का?’ या व्हायरल लिंकमागील...

‘तुमचे व्हाट्सएप स्टेटस ३० पेक्षा जास्त लोक पाहतात का?’ या व्हायरल लिंकमागील सायबर धोका

0

इंटरनेट मुळे अनेक सुखसुविधांसह गुन्ह्यांचे प्रमाणही वाढत चालले आहे. पैशांचे तसेच इतर काही आमिष दाखवून सायबर गुन्हेगार सामान्य लोकांना आपल्या जाळ्यात अडकवतात. अशाच प्रकारचे एक आमिष काही दिवसांपासून व्हाट्सएपवर फॉरवर्ड होत आहे. आपले व्हाट्सएप स्टेटस ३० पेक्षा अधिक लोक पाहतात का असा प्रश्न या मेसेजमध्ये विचारलेला असतो आणि त्या मेसेजमध्ये एक लिंक असते. ही लिंक आपल्याला व्हाट्सऍप स्टेटसला ठेवायची असते व त्याबदल्यात पैसे मिळतील असेही या मेसेजमध्ये सांगितलेले असते.

या लिंकवर आपली व्यक्तिगत माहिती भरावी लागते. स्वतःचा मोबाईल नंबर, जिल्हा, इमेल आयडी अशी सर्व माहिती भरून घेतली जाते. जर आपले स्टेटस ३० पेक्षा अधिक लोकांनी पाहिले तर आपल्याला ५०० रुपये मिळतील असे सांगितले जाते. या आमिषाला बळी पडून बऱ्याच लोकांनी ही लिंक व्हाट्सएप स्टेटसला ठेवली व अनेकांनी त्यात माहितीही भरली. मात्र अजून कोणाला पैसे मिळाले नाहीत. हे पैसे देण्यासाठी बँकेचे तसेच कार्डचे डिटेल्स मागितले जाऊ शकतात व हे कोणी सायबर गुन्हेगार करत असेल तर आपल्या खात्यातून पैसेही जाऊ शकतात. त्यामुळे याबाबत सतर्क राहण्याचा व आपल्या बँक अथवा डेबिट कार्डची कुठलीही माहिती कोणाला देऊ नका असा इशारा जालन्याच्या पोलीस अधीक्षकांनी दिला आहे.