Home महाराष्ट्र “कोरोना गेल्यावर एकमेकांच्या उरावर बसा पण आता राजकारण कशाला करताय?”: राजू शेट्टी

“कोरोना गेल्यावर एकमेकांच्या उरावर बसा पण आता राजकारण कशाला करताय?”: राजू शेट्टी

0

लॉकडाऊनच्यामुळे महसूलाचे सारेच स्त्रोत बंद असून मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये मदत करण्याचं आवाहन सरकारकडून केलं जात आहे. राज्यातील भाजप नेत्यांनी मात्र पीएम फंडाला निधी जमा केला असून पीएम फंडालाचं मदत करण्याचं आवाहनही केलं आहे. भाजपच्या कृतीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी संताप व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्री फंडाला पैशांची गरज असताना भाजपचे नेते पीएम फंडाला पैसे द्या, असं सांगत आहेत. हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा अपमान आहे. मुख्यमंत्री पदावर कोण आहे, हे बघण्यापेक्षा ते घटनात्मक पद आहे. त्या पदाचा मान राखला पाहिजे. पण भाजपवाले असल्या अडचणीच्या काळात सुद्धा सूडबुद्धीनं वागत आहेत.

सत्ता गेल्याचा राग अजून त्यांच्या मनातून गेलेला नाही, हे यातून दिसत आहे, अशी टीका शेट्टी यांनी केली आहे.

भाजपचे महाराष्ट्रातील नेते पोरकटपणे वागत आहेत. दोन महिन्यांनी एकमेकांच्या उरावर बसा, पण आता कशाला राजकारण करता? असा सवाल शेट्टी यांनी राजकीय पक्षांना केला आहे.

मुख्यमंत्री फंडाला दिलेली मदत उद्धव ठाकरे घरखर्चाला वापरणार नाहीत किंवा पीएम फंडाला दिलेली मदत पंतप्रधान घरी नेणार नाहीत, हे खरं असलं तरी आज महाराष्ट्र सरकारला पैशांची गरज आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता आणि उद्योजकांनी मुख्यमंत्री फंडाला मदत करावी, असं आवाहन शेट्टी यांनी केलं आहे.