Home महाराष्ट्र एकनाथ खडसे व कन्या रोहिणी खडसे यांचा राष्ट्रवादी पक्षप्रवेश सोहळा संपन्न!

एकनाथ खडसे व कन्या रोहिणी खडसे यांचा राष्ट्रवादी पक्षप्रवेश सोहळा संपन्न!

0

गेल्या चाळीस वर्षांपासून राजकारणात सक्रिय असलेले जळगाव जिल्ह्यातील प्रभावी व्यक्तिमत्व व भाजप नेते एकनाथ खडसे यांनी अखेर भाजपला रामराम ठोकला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. खडसेंसमवेत त्यांची मुलगी रोहिणी खडसेंच्या देखील भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये पक्षांतर केले.

मीडिया न्यूजनुसार गेल्या काही महिन्यांपासून खडसेंना भाजपमध्ये डावललं जात होतं. विधानसभा निवडणुकीच्या वेळी तसेच राष्ट्रीय स्तरावर भाजपचे प्रतिनिधी पाठवतांनाही खडसेंना डावलण्यात आले. त्यामुळे त्यांनी भाजप सोडून आता राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला. आज खडसेंनी पक्षांतर करण्याआधी एक ट्विट केले ज्यात लिहिले होते की, ‘संयम सुटल्यावर काहीतरी वेगळा व मोठा निर्णय घ्यावाच लागतो, कारण अन्याय व बदनामी जास्त दिवस सहन करायची नसते..!’ तसेच ‘ही लढाई आत्मसन्मानाची’ असे लिहिलेला स्वतःचा फोटोदेखील पोस्ट केला.

काही दिवसांपूर्वी खडसेंची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती तेव्हापासून खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे जवळपास नक्की होते. राजकीय वर्तुळात व मीडियामध्ये याबद्दलच्या चर्चेला उधाण आले होते. मात्र खडसे याबद्दल काहीही बोलत नव्हते. शेवटी काल त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत असल्याचे जाहीर केले व मुलगी रोहिणी खडसेसोबत कालच हेलिकॉप्टरने मुंबईला आले. शेवटी आज त्यांनी पक्षप्रमुख शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी ट्विटमार्फत खडसेंचे स्वागत केले. तसेच शरद पवारांनी ट्विटमध्ये सांगितले की ‘नाथाभाऊ कुठलीही अपेक्षा न ठेवता पक्षात प्रवेश करत आहेत.’