सत्ता स्थापनेचा तिढा सुटण्या ऐवजी अजूनच गुंतागुंतीचा होत चालला आहे. गुरुवारी अर्थात कालच मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या आमदारांची बैठक पार पडली. भाजप आपले आमदार फोडतील या भीतीने सर्वांना एकत्रीत करून शिवसेना सर्व आमदारांना अज्ञात स्थळी हलवणार अशी चर्चा होती. मात्र राऊत यांनी ‘ही निव्वळ अफवा आहे’ असा खुलासा दिला. सदर बैठकीत “लोकसभेला ठरलं आहे तेच करा, मला आणखी काही नको, मी युती स्वत:हून तोडणार नाही. ते पाप मला नको, मुख्यमंत्रिपद मान्य असेल तर भाजपाच्या श्रेष्ठीने फोन करावा” असं मत बैठकीत मांडलं. म्हणजेच यावरून शिवसेना मुख्यमंत्री पदासाठी पुन्हा एकदा मैदानात उतरले असून जोरदार चेंडू फेकायच्या तयारीत आहे.
लोकमतच्या न्यूज नुसार “एका हिंदी वृत्तवाहिनीच्या बातमीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अनेकदा संपर्क करण्याचा प्रयत्न केला. सूत्रांच्या माहितीनुसार फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना ३ वेळा फोन केला. मात्र हे फोन उचलले गेले नाहीत असं सांगण्यात येत आहे. शिवसेना मुख्यमंत्रिपदावर ठाम असतांनाही दिवाळी फराळाच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस यांनी अनपौचारिक गप्पा मारताना ‘मुख्यमंत्रिपदाबाबत युतीच्या बैठकीत काहीही ठरलं नव्हतं’ असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे उद्धव ठाकरे नाराज झाले होते.”
बैठकीत उद्धव ठाकरे असेही म्हटलं की, “जे बैठकीत ठरलं होतं तेच मी मागत होतो. मात्र मला खोटं पाडणार असाल तर ते सहन करणार नाही.” त्याचबरोबर “सरकार बनविण्याची संधी सर्वात मोठ्या पक्षाला आधी मिळते. शिवसेनेशिवाय सरकार बनविणार नाही असं भाजपा नेते म्हणतात. मग लोकसभापूर्वी काय ठरलं होतं त्यावर बोलावं. कोणाच्याही मध्यस्थीची गरज नाही” असं म्हणत त्यांनी मध्यस्थीला धुडकावून लावलं आहे. एकंदरीतच हे सर्व चित्र पाहता शिवसेना मुख्यमंत्री पदासाठी पुन्हा आक्रमक झालेले दिसते अशी माहिती प्रसारमाध्यमांद्वारे मिळत आहे.