पुण्याच्या ‘येवले अमृततुल्य’ चहावर अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) निर्बंध लावले आहेत. एफडीएच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे पुढील आदेश मिळेपर्यंत उत्पादन बंद ठेवण्यात यावे असा आदेश एफडीएचे सह आयुक्त एस एस देशमुख यांनी दिला आहे.
कोंढवा येथील ‘येवले फूड प्रॉडक्ट्स’ येथे एफडीएने अचानक केलेल्या तपासणीत चहामध्ये मेलानाईट नावाचा पदार्थ अतिप्रमाणात वापरण्यात येत असल्याचा संशय व्यक्त केला. तसेच सहा लाख रुपये रकमेचा संशयित साठा एफडीएने त्यावेळी जप्त केला. तसेच पुण्यातील अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी येवले फूड प्रॉडक्ट्सचे चहा पावडर, चहा मसाला, साखर यांचे नमुने येवले यांच्या पुण्यातील पॅकबंद साठ्यांतून तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत. याशिवाय येवले चहाच्या जाहिरातीत ‘चहासाठी मिनरल वॉटर वापरले जाते’ असे सांगितले जाते परंतु ही जाहिरात दिशाभूल करणारी आहे अशी तक्रार ‘अॅडवरटायझिंग स्टँडर्ड काउन्सिल ऑफ इंडिया’ कडे करण्यात आली आहे असेही एफडीएच्या अधिकाऱ्यांकडून समोर आले.
येवले फूड प्रॉडक्ट्सच्या अन्नपदार्थांच्या घटकांची प्रयोगशाळेतून तपासणी होत नाही, उत्पादनस्थळी पेस्ट कंट्रोल केले जात नाही, उत्पादन प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी योग्य व्यक्तीची नेमणूक केलेली नाही, उत्पादनांच्या पाकिटांवर आवश्यक ती माहिती छापलेली नसते अशा विविध बाबी समोर आल्यामुळे एफडीएने येवले चहावर त्वरित कारवाई करत उत्पादन बंद करण्याचे आदेश दिले आहेत.