अंतीम परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांना पास करून घेण्याचा निर्णयाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या घोषणेमुळे सध्या विद्यार्थी प्रचंड खुष आहेत. आता एटीकेटीच्या विद्यार्थ्यांनाही पास करून घेण्याबाबत युवक काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी मागणी केली होती. त्याला उच्च व तंत्रशिक्षणमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी ट्विटरवरून ग्रीन सिग्नल दिला आहे. त्यामुळे काही विषय राहिलेल्या विद्यार्थ्यांचे शेवटच्या वर्षाबरोबरच इतर विषयही सुटण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्र्यांनी अंतीम वर्षाच्या विद्यार्थ्यांना पास करण्याबाबत केलेल्या घोषणेमुळे विद्यार्थ्यांना सरासरी गुण मिळून त्यांचा पास होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
तनपुरे यांनी म्हटले, प्रिय, सत्यजीत तांबे, काळजी नसावी,एटीकेटीविषयी आपली तळमळ मी समजू शकतो. विद्यार्थीदशेत मी बऱ्यापैकी स्टुडिअस विद्यार्थी असलो, तरी एटीकेटी असलेल्या मित्रांची मग ते माझ्या बॅचचे असोत, ज्युनिअर असोत वा बंधुतुल्य. काय मनःस्थिती असायची याची कल्पना मला आहे. कोणावर अन्याय होणार नाही, ही शासन काळजी घेईल.
सत्यजीत तांबे यांनीही उत्तर देताना ट्टिवटरवर म्हटले, धन्यवाद दादा, स्वत: तुम्हीही इंजिनीअरींगचे विद्यार्थी असल्याने तुम्हाला या विद्यार्थी मित्र-मैत्रीणींच्या भावना समजणे साहजिकच आहे. इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असल्याने तुम्हाला बॅकलाॅग व ए.टी.के.टीचेही महत्त्व माहितीच असणार. तेवढं ते पण मिटवून टाका म्हणजे झालं.
ही सकारात्मक चर्चा एटीकेटी विद्यार्थ्यांना लाभदायक ठरण्याची चिन्हे आहेत.