राज्यात निवडणुकीचा निकाल लागून १९ दिवस झाले तरी नवीन सरकार स्थापन झालं नाही. राज्यपालांनी सुरुवातीला राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला सत्तास्थापनेचे आमंत्रण दिले होते. मात्र आवश्यक बहुमत नसल्याचे सांगत भाजपने सत्ता स्थापन करण्यास असमर्थ असल्याचे सांगितले. त्यानंतर दुसरा मोठा पक्ष म्हणून राज्यपालांनी शिवसेनेला आमंत्रण दिले. मात्र राज्यपालांनी मुदत वाढवून न दिल्याने शिवसेनेलाही काही करता आले नाही. राज्यपालांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना राजभवनावर भेटीसाठी बोलावून सत्तास्थापनेचे आमंत्रण दिले आणि आज मंगळवार साडे आठ वाजेपर्यंतची वेळ दिली होती. परंतु राष्ट्रवादीदेखील बहुमत सिद्ध करू शकली नाही. शेवटी राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटत नाही हे पाहता राज्यपालांनी केलेली राष्ट्रपती राजवटीची शिफारस राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मान्य केली आहे. आणि त्यावर आपल्या संमतीची मोहर देखील लावली आहे. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी देखील १९७८ आणि २०१४ साली राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली होती.
मीडिया न्यूज नुसार मंगळवारी दुपारी साडेबाराच्या दरम्यान राष्ट्रवादीने आम्ही आत्ता आवश्यक संख्याबळ जमवू शकत नाही असे पत्र राज्यपालांना दिले. यानंतर राज्यपालांनी राष्ट्रपतींकडे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली होती. अखेर सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान राष्ट्रपतींनी या शिफारशीवर स्वाक्षरी केली.