Home महाराष्ट्र काँग्रेसला आणखी एक धक्का! माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा भाजपात प्रवेश…

काँग्रेसला आणखी एक धक्का! माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा भाजपात प्रवेश…

0

यंदाच्या विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असतांना विस्कळीत होत चाललेल्या काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. कालच उर्मिला मातोंडकर यांनी पक्ष सोडल्याच्या बतमीनंतर आज माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी देखील काँग्रेस सोडल्याची बातमी समोर आली आहे. याहूनही खळबळजनक वार्ता म्हणजे हर्षवर्धन पाटील भाजप मध्ये प्रवेश करणार असल्याचे समोर आले आहे.

हर्षवर्धन पाटील हे इंदापूर विधानसभा मतदार संघातून सलग चार वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारमध्ये ते १४ वर्ष मंत्रीपदावर होते. विधानसभा निवडणुका जवळ आलेल्या असतांना राष्ट्रवादीने विश्वासघात केल्यामुळे ते पक्ष सोडणार असल्याची चर्चा जवळपास मागील महिन्यापासून चालू होती. दरम्यान त्यांचे मतपरिवर्तन करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. परंतु एका पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटल तेव्हा ते भाजपमध्ये प्रवेश करणार हे जवळपास निश्चित झाले होते. याचा परिणाम काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीवर होण्याची शक्यता आहे.
आज दुपारी ३ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हर्षवर्धन पाटील भाजप मध्ये प्रवेश करणार आहेत. काँग्रेसमध्ये आपल्यावर सतत अन्याय झाल्याने आपण पक्ष सोडत असल्याचा निर्णय घेत आहोत असे हर्षवर्धन यांनी मीडियाशी बोलतांना सांगितले. तसेच भाजपात कुठल्याही अटींशिवाय आपण जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.