भारतात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत चाललेला असताना महाराष्ट्रातून पहिलीच आनंदाची बातमी आली आहे. पुण्यात ९ मार्चला महाराष्ट्रात कोरोना पॉझिटिव्ह आढळलेले पहिले दाम्पत्य आता पूर्ण बरे झाल्याची माहीती ‘पुणे पालिका’ आयुक्त ‘शेखर गायकवाड’ यांनी दिली आहे. गेल्या १४ दिवसांपासून त्या दाम्पत्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांनंतर आता केलेली प्राथमिक चाचणी ही निगेटिव्ह आली आहे.
मार्च महिन्याच्या सुरुवातीस दुबईहून पुण्यात आलेल्या दाम्पत्याला कोरोना झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आणि संबंधित दाम्पत्यानंतर आणखी तिघांना कोरोना झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. ९ मार्चला ही बातमी समोर आल्यानंतर पुण्यासह महाराष्ट्रात प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात कलम १४४ लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून जमावबंदी सोबतच संचारबंदी सुद्धा लागू करण्यात आली आहे. कोरोना रोखण्यासाठी नाईलाजास्तव असा कठोर निर्णय घ्यावा लागत असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.महाराष्ट्रात गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत २४ ने वाढ झाली आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या ९७ वर पोहोचली आहे. गेल्या दोन दिवसांत रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत असल्यानं महाराष्ट्रात चिंतेचं वातावरण आहे. कोरोनाच्या भीतीने गेल्या आठवड्यापासून पुण्यात अघोषित लॉकडाउनचं चित्र होतं.