काल सायंकाळपासून पुण्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. रात्रीपासून पावसाचा जोर वाढला असून त्यामुळे बऱ्याच अपघाताच्या बातम्या समोर येत आहेत. तसेच काही ठिकाणी पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पुण्यातील अनेक रस्ते, घरे पाण्याखाली गेल्याच्या घटना घडल्या.
दक्षिण पुण्यातील अरण्येश्वर येथील आंबिल ओढ्यातील पाण्याचे प्रमाण वाढल्याने पुराची स्थिती निर्माण झाली. यामुळे लगतच्या टांगेवाला कॉलनीत पाणी शिरल्याने एका कच्च्या घराची भिंत कोसळल्याने पाच जणांचा मृत्यू झाला असे मीडिया न्यूज वरून समजले. तर ३ – ४ लोक वाहून गेल्याची संभावना पोलीस व्यक्त करत आहेत. याशिवाय परिसरातील अनेक वाहने देखील पुरात वाहून गेल्याचे समोर आले. कात्रज परिसरात पुणे-बेंगळुरू महामार्गावर दरड कोसळली असून तेथील वाहतूक थांबली आहे. रेसकोर्स भागातील काही घरे पाण्याखाली गेल्याने रात्री लष्कराने तेथील ५०० लोकांना हलवले. याशिवाय अनेक भागांत पाणी साचले असून शहरातील वाहतूक खोळंबली आहे. तसेच शाळा कोलेजेसला सुट्टी जाहीर केली आहे. पाणी साचलेल्या भागातील तसेच नदीकाठच्या रहिवाश्यांना स्थलांतरित करण्यात आले असून पाण्याचा निचरा करणे चालू आहे अशी माहिती स्थानिक प्रशासनाने दिली.