Home महाराष्ट्र नागपूर विदर्भात ऐन हिवाळ्यात गारांसह जोरदार पाऊस; शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

विदर्भात ऐन हिवाळ्यात गारांसह जोरदार पाऊस; शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

0

बदलत्या पर्यावरणामुळे ऋतुचक्रावर होत असलेले परिणाम गेल्या काही वर्षांपासून आपण अनुभवत आहोत. ऑक्टोबर व नोव्हेंबर २०१९ मध्ये परतीच्या पावसामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पिकांचे नुकसान झाले. तसेच अतिवृष्टीमुळे बऱ्याच ठिकाणी पूरस्थिती देखील निमार्ण झाली होती. या सर्व नुकसानीनंतर हिवाळ्यात तरी काही अडचण येणार नाही अशी आशा सर्वांना होती. परंतु या आशेवर पाणी फेरत विदर्भात मेघगर्जनेसह गारपीट झाली व मुसळधार पाऊसही पडला. ऐन हिवाळ्यात पडलेल्या या पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे असे मीडिया न्यूजवरून समजले.

महाराष्ट्र टाईम्सच्या वृत्तानुसार विदर्भातील नागपूर, अमरावती, धारणी तसेच अजून काही ठिकाणी विजांसह गारांचा पाऊस पडला. तसेच वर्धा, हिंगोली, वाशीम, नांदेड, पुसद, भंडारा, यवतमाळ या शहरांमध्येही विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. आज अर्थात दिनांक २ जानेवारी २०२० ला सकाळी २.३० वाजेच्या सुमारास अमरावती व नागपूरमध्ये पावसाला सुरुवात झाली. त्यापाठोपाठ काही भागांमध्ये मोठमोठ्या गारा देखील पडल्या. अचानक आलेल्या या पावसामुळे या भागांतील पिकांचे प्रचंड नुकसान झाले तसेच वीजपुरवठा देखील खंडित झाला. ऐन हिवाळ्यात आलेल्या या पावसामुळे तापमानात कमालीची घट झाली असून थंडीत वाढ झाली आहे.