हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेचा आज संकलक मृत्यू झाला. हल्ल्यानंतर पीडितेवर गेल्या ७ दिवसांपासून नागपूरच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. तिची मृत्यूची झुंज अखेर आज संपली. आज सकाळी अनेक प्रसारमाध्यमांवर प्रसारित झालेल्या या बातमीने हिंगणघाट परिसरात तसेच संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली. राज्यभरातून सदर घटनेतील आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी केली जात आहे. बऱ्याच राजकीय नेत्यांनीही यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. याचेच उदाहरण म्हणजे निलेश राणे यांनी आरोपीला जागीच ठार मारण्याची मागणी केली.
लोकमतच्या रिपोर्टनुसार निलेश राणे यांनी ट्विट करून याबाबत आपले मत व्यक्त केले. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणाले की, “हिंगणघाटातल्या आमच्या बहिणीचा जीव गेला. पोलिसांना बंदूका फक्त हवेत गोळी मारायला दिल्या आहेत काय? त्या हरामखोराला जागेवरच ठार मारा. एक उदहरण होऊ द्या की महाराष्ट्रात मुलींना/महिलांना नाय त्या नजरेने कोणीही बघू शकत नाही.”
तसेच पीडितेच्या वडिलांनी संताप व्यक्त करत ‘मारेकऱ्याला आमच्या स्वाधीन करा, जिवंत जाळा’ असे वक्तव्य केले. याशिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबद्दल बोलतांना म्हणाले की, “या प्रकरणाचा खटला लवकरच न्यायालयात पूर्ण होईल व गुन्हा सिद्ध होताच आरोपीला फाशी देण्यात येईल. महाराष्ट्राला पुरोगामी परंपरा आहे. माता-भगिनींचा सन्मान करणारा प्रदेश म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे. या प्रतिमेला तडा देणाऱ्या या गोष्टींना कदापिही खपवून घेतले जाणार नाही. असं कृत्य करण्याचं परत कोणाचं धाडस होणार नाही असा कायदा करू.”