Home महाराष्ट्र नागपूर भरतीच्या बनावट मॅसेजमुळे शेकडो तरुणांची फसवणूक : परत गावी जाण्यासाठी अनेकांना रात्र...

भरतीच्या बनावट मॅसेजमुळे शेकडो तरुणांची फसवणूक : परत गावी जाण्यासाठी अनेकांना रात्र काढावी लागली थंडीत…

0

भरतीच्या बाबतीत फसणुकीचे प्रमाण फारच वाढले आहे. अशात एक अजबच प्रकार समोर आला आहे. भरतीचा एक बनावट मॅसेज वाचून राज्यातील विविध जिल्ह्यातील तरुण बुधवारी नागपूरला आले होते. एरिया रिक्रूटमेंट ऑफीस अर्थात एआरओ ला पोहचल्यानंतर त्यांना कळलं की भरतीची कुठलीही प्रक्रिया होणार नसून त्यांना आलेले मॅसेज बनावट आहेत. सायंकाळी नागपूरच्या जवळपास राहणारे सर्व तरुण घरी परतले मात्र लांबून आलेल्या व छोट्या गावातील अनेकांना घरी जाण्यासाठी वाहन उपलब्ध नसल्याने वा प्रायव्हेट गाडी परवडत नसल्याने जागा मिळेल तिथे रस्त्यावरच मोठ्या थंडीत रात्र काढावी लागली.

या संदर्भात सविस्तर वृत्त असे की, राज्यातील विविध जिल्ह्यांतील तरुण बुधवारी दुपारी २ वाजेपासून नागपुरात भरतीसाठी येण्यास सुरुवात झाली होती. परिणामी एआरओ कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर गर्दी झाली. मात्र तरुणांंना आतमध्ये जाण्याची परवानगी न देता घरी परतण्याचा सल्ला दिला. व्हॉटस्अप मॅसेज आल्यानंतर खातरजमा करायला हवी होती हे तरुणांना कळून चुकले. महत्वाचे म्हणजे एआरओचे भरती कार्यालय आता स्थलांतरित करण्यात आले आहे. त्यामुळे मुलांना इथे भरतीसाठी बोलावण्याचा प्रश्नच येत नाही अशी माहिती वरिष्ठांनी दिली. भरतीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांची मात्र विनाकारण तारांबळ झाली. काही लोक उसने पैसे घेऊन या भरतीसाठी आले होते तर काही हातची कामे सोडून. शेवटी या प्रकारा विरोधात तरुणांनी गुन्हा दाखल केला आहे.