कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रात अडकून पडलेल्या परराज्यातील मजुरांना त्यांच्या मूळगावी पाठवण्यासाठी विशेष ट्रेनची व्यवस्था करण्याचा विचार केंद्र सरकारने करावा, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. ३० एप्रिल ते १५ मे यादरम्यान कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती केंद्रानं व्यक्त केली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी विशेष ट्रेन सोडण्याबद्दल विचार करण्याची मागणी केंद्राकडे केली आहे.
केंद्रानं विशेष रेल्वे सोडल्यास अडकून पडलेल्या मजुरांना आणि कामगारांना त्यांच्या घरी परतता येईल.
याबद्दलच्या मार्गदर्शन सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वे मंत्रालयानं एप्रिलच्या अखेरपर्यंत द्याव्यात, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली आहे. मुख्यमंत्री कार्यालयानं ट्विटरच्या माध्यमातून याबद्दलची माहिती दिली. परराज्यामधून मुंबईत आलेल्या मजुरांनी घरी परतण्यासाठी गेल्याच आठवड्यात वांद्रे स्थानकाबाहेर गर्दी केल्याचं पाहायला मिळालं होतं.
परराज्यातील अडकलेल्या कामगारांची निवारा केंद्राच्या माध्यमातून उत्तम व्यवस्था केली जात आहे. साधारणत: ६ लाख स्थलांतरित कामगार आणि मजुरांच्या रोजच्या जेवणाची आणि इतर व्यवस्था केली गेली आहे. त्यांची जबाबदारी राज्य शासनाने घेतली आहे. मात्र तरी ते लोक त्यांच्या घरी जाऊ इच्छितात. काही वेळा ते आंदोलनाच्या पवित्र्यात येतात. जर ३० एप्रिल नंतर १५ मे पर्यंत विषाणुचा प्रादुर्भाव वाढण्याचा अंदाज केंद्र सरकार व्यक्त करत असेल तर आता हातात असलेला कालावधी लक्षात घेऊन यासंदर्भात विचार करावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली आहे.