शनिवारी सकाळी अचानक राज्याच्या राजकारणाने एक असे वळण घेतले ज्याची कुणी अपेक्षाही केली नव्हती. रातोरात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी राज्यपालांची भेट घेऊन सकाळी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची तर फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि सगळीकडे एकच खळबळ माजली. अजित पवारांच्या या निर्णयाला शरद पवारांची साथ नाही असे शरद पवारांनी स्वतः स्पष्ट केले. सुप्रिया सुळे यांनी देखील अजित पवारांना “आमच्यासाठी अजित पवार आता कुटुंबाचा हिस्सा नाही” असं सांगितलं. अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली हे स्पष्ट दिसत होतं.
दरम्यान आता शरद पवारांच्या बाजूने कोण आणि अजित पवारांच्या बाजूने कोण आमदार असतील याची राजकीय वर्तुळात आणि सोशल मिडीवर चर्चा चालू झाली. यावेळी अनेक आमदारांनी सोशल मीडियाद्वारे शरद पवारांना पाठींबा देत असल्याचे जाहीर केले. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांचाही समावेश होता. धनजंय मुंडे आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून केलेल्या ट्विट मध्ये म्हणाले की, “मी पक्षासोबत, मी आदरणीय पवार साहेबांसोबत. कृपया कोणीही कोणताही संभ्रम निर्माण करू नये ही विनंती”.
धनंजय मुंडे यांच्या ट्विटला हजारो लोकांनी लाईक केलं, रिट्विट केलं, अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. दरम्यान एका कार्यकर्त्याच्या प्रतिक्रियेने अनेकांचे लक्ष आकर्षित केले आहे. हा राष्ट्रवादीचा समर्थक मुंडेंची ट्विट रिट्विट करत म्हणाला, “तुम्ही सुद्धा पवार साहेबांची साथ सोडली तर मी आत्महत्या करेल, कारण ‘उत्तर तुम्हांला नाही कार्यकर्त्यांना द्यावं लागतं.” अशी धमकी कम खंत या कार्यकर्त्याने बोलून दाखवली. सिद्धेश निकम पाटील असं या कार्यकर्त्याचं नाव असून हा शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कट्टर समर्थक असल्याचे लक्षात येते. सिद्धेश निकम यांची सविस्तर ट्विट पुढील प्रमाणे…
“साहेब मी स्वतः काल तुम्हाला 7-8 कॉल केले. नॉट रीचेबल लागत होता तुमचा फोन. किती टेन्शन घेतलं मी काल पासून हे फक्त माझ्या घरच्याना माहीत. तुम्ही सुद्धा पवार साहेबांची साथ सोडली तर मी आत्महत्या करेन. कारण उत्तर तुम्हाला नाही ओ कार्यकर्त्यांना द्यावे लागत” असं सिद्धेश यांनी ट्विट केलं केवळ सिद्धेश यांनीच नाही तर अनेक समर्थक आणि कार्यकर्त्यांनी राजकारणाच्या सद्यस्थितीवर हळहळ व्यक्त केली.