प्राईम नेटवर्क : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली १ ऑगस्टपासून भाजपाची महाजनादेश यात्रा सुरू आहे. या यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला आज पासून सुरुवात झाली असून मुख्यमंत्री यात्रेसह अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे दाखल झाले आहेत. या वेळी महाजनादेशाच्या कार्यक्रमा दरम्यान सुप्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर हे देखील उपस्थित होते.
महाराजांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या तसेच पूरग्रस्तांना मदतनिधी म्हणून महाराजांनी १ लाख रुपयांची मदत दिली. आपल्या भाषणापूर्वी मुख्यमंत्र्यांनी पुष्पगुच्छ देऊन इंदुरीकर महाराजांचे स्वागत केले. किर्तनातून जनप्रबोधन करणाऱ्या आणि तरुणांना राजकारणापासून दूर राहण्याचे सुचवणाऱ्या इंदुरीकर महाराजांना भाजपाच्या व्यासपीठावर पाहून अनेक लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले. महाराज या महाजनादेश यात्रेला उपस्थित होते परंतु आपली कुठलीही राजकीय भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली नाही. महाराजांनी पूरग्रस्तांसाठी दिलेल्या मदतनिधीसाठी मुख्यमंत्र्यांनी त्यांचे ट्विटद्वारे आभार मानले आहेत.