राज्याच्या विविध भागात अडकून पडलेल्या मजुरांसाठी राज्य परिवहन सेवा म्हणजेच ST ही सेवा देणार हे जाहीर केल्यानंतर लगेचच तो निर्णय मागे घेण्यात आल्यामुळे एकचं गोंधळ उडाला. या घटनेवरून राज्यपरिवहन मंत्री अनिल परब यांचा नितेश राणे यांनी खरपूस समाचार घेतला.
“चुकीची माहिती दिल्यामुळे गर्दी झाली असा आरोप करत एका खासगी वृत्तवाहिनीच्या पत्रकाराला अटक करण्यात आली, आता मात्र अनिल परब यांनी खुद्द स्वतः चुकीची माहिती पसरवून गर्दी जमा केली, मग आता त्यांना कधी अटक होणार?”, असा खडा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे.
नागरिकांना घरी पोहचवण्यासाठी सरकारने ११ मे पासून मोफत सेवा सुरू करणार असल्याची बातमी व्हायरल झाली होती आणि त्यातूनचं अनेक बस स्थानकांवर गर्दी बघायला मिळाली. या गर्दीमध्ये अडकलेले विद्यार्थी, कामगार यांचा मुख्यत्वे समावेश होता. ही गर्दी शेवटी हाताबाहेर गेल्याने पोलिसांना पाचारण करावे लागले, काही ठिकाणी सौम्य लाठीचार्ज नंतर गर्दी निवळली.