कोरोना परिस्तिथीमुळे मुळे राज्याच्या तिजोरीत खडखडाट झालेला असल्याने कर्मचार्यांचे वेतन देण्यासाठी राज्य सरकारवर कर्ज घेण्याची वेळ आली आहे. मात्र शिक्षणमंत्री, क्रीडा मंत्र्यांच्या गाड्या खरेदीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तब्बल १ कोटी ३७ लाख रुपये मंजूर केले आहेत. सदर प्रकरणामुळे जनतेत संतापाची लाट उसळली आहे.
राज्यामध्ये तीन महिन्यांपासून कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनामुळे केलेल्या लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे बंद पडले असून, सर्व व्यवहार ठप्प झाले असून राज्य सरकारचे सगळीकडचे उत्पन्न बंद झाले आहे. कोरोना रुग्णांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे, स्थलांतरित मजुरांच्या जेवणाची सोय, क्वारंटाईन झालेल्या नागरिकांची सोेय करणे, वैद्यकीय सामग्री खरेदी करणे, कोरोना चाचण्या करणार्या प्रयोगशाळा उभारणे अशा महत्त्वाच्या कामांमध्ये सरकारचा पैसा मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे. त्यामुळे सरकारी तिजोरीत खडखडाट झाला असल्याने सरकारी कर्मचार्यांचे वेतन देण्यासाठीही सरकारकडे पैसे नाहीत. त्यामुळे वेतन देण्यासाठी कर्ज घेण्याची वेळ ठाकरे सरकारवर आली आहे.
ह्या सर्व गोष्टी असताना सुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार, शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू, क्रीडा राज्यमंत्री आदिती तटकरे व स्टाफ कर्मचार्यांच्या वापरासाठी एक अशा सहा गाड्या खरेदी करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी दिली आहे.