अंबरनाथमध्ये एका मनसेच्या विधानसभा उमेदवाराने राज ठाकरे यांना शिवीगाळ केली असा आरोप करीत एका राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याचे समोर आले आहे. लोकसत्ताच्या एका रिपोर्ट नुसार मारहाण करणाऱ्या मनसे नेत्याचे नाव सुमेध भवार आहे, ज्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना शिवीगाळ केली म्हणून राष्ट्रवादी पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याचे कबुल केले. सुमेध यांनी विधानसभा निवडणुका तोंडावर असतांना भाजपातून मनसेत प्रवेश केला होता. त्यांना भाजपामधून विधानसभा लढण्याची इच्छा होती. मात्र मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेल्याने ते नाराज झाले व त्यांनी पक्ष सोडला होता अशी माहिती मिळत आहे.
या घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की, सचिन अहिरेकर या राष्ट्रवादी पदाधिकाऱ्याला मारहाण झाली असून त्यांनी सुमेध भवार व त्यांच्या अंगरक्षकांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप केला व डोक्यात दगड घालण्यात आल्याचं देखील त्यांनी सांगितले आहे. अहिरेकर हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अंबरनाथ विधानसभा अध्यक्ष असून पोलिसांनी सुमेध भवार विरोधात गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती लोकसत्ताने दिली.