प्राईम नेटवर्क: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या रविवारी (ता. 17) होणाऱ्या राज्यसेवा परीक्षेची प्रवेशपत्रे उपलब्ध झाली असून, बैठक व्यवस्था उमेदवारांच्या मोबाईल क्रमांकानुसार निश्चित करण्यात आली आहे. काही उमेदवारांचे मोबाईल क्रमांक हे एकापाठोपाठ क्रमांक असल्याने त्यांचे आसन क्रमांकही एकापाठोपाठ आले आहेत. यामुळे परीक्षेत मास कॉपी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
एमपीएससी परीक्षेची बैठक व्यवस्था पूर्वी उमेदवारांच्या नावाच्या इंग्रजी आद्यावलीनुसार आणि आईच्या नावाप्रमाणे निश्चित केली जात होती. मात्र, दोन वर्षांपासून बैठक व्यवस्था मोबाईल क्रमांकानुसार निश्चित केली जात आहे. त्याचाच गैरफायदा घेत खासगी क्लासेस किंवा अभ्यासिकेत गटाने अभ्यास करणाऱ्या काही उमेदवारांनी एका पाठोपाठ क्रमांक असणारे नवे सीमकार्ड खरेदी केले असून, बैठक व्यवस्थेत त्यांचा आसनक्रमांक एकापाठोपाठ आला आहे.
दोन-तीन वर्षांपासून जीव तोडून रात्रंदिवस अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांची मेहनत मात्र काही उमेदवार परीक्षेत गैरप्रकार करून यश मिळवत असल्याने वाया जात आहे. नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या कृषी सेवा परीक्षेच्या निकालात अनेक यशस्वी उमेदवारांचे आसन क्रमांक एकापाठोपाठ असल्याचे सिद्ध झाले आहे.
मध्यंतरी काही उमेदवारांनी एमपीएससीच्या संकेतस्थळावरील प्रोफाईल अपडेट करू देण्याची मागणी केली होती. त्या वेळी अनेक उमेदवारांनी आपले मोबाईल क्रमांक नव्याने अपलोड केले. या उमेदवारांनी परीक्षेत सामूहिक कॉपी करण्यासाठी मोबाईल क्रमांक बदलल्याची शक्यता नाकारता येत नाही. याप्रकरणी एमपीएससीने तातडीने लक्ष घालण्याची मागणी प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या उमेदवारांनी केली आहे.