केवळ राज्यालाच नाही तर संपूर्ण देशाला यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे वेध लागले आहेत. यंदाच्या पंचवार्षिक मध्ये कोण बाजी मारणार आणि कुणाची सत्ता राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असतांना निकाल अगदी उद्यावर येऊन ठेपला आहे. मीडिया न्यूज नुसार यंदाच्या मतमोजणीला विधानसभेच्या २८८ जागांसह साताऱ्यातील लोकसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीसाठी राज्यात २५ हजारांहून अधिक कर्मचारी व अधिकारी सज्ज होऊन बसले आहेत. त्याचबरोबर मतमोजणी दरम्यान कोणताही गैर प्रकार घडू नये म्हणून प्रत्येक मतमोजणी केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त राहणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार उद्या सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. मतमोजणीच्या वेळी निवडणूक उमेदवारांच्या प्रतिनिधींना मतमोजणी दरम्यान उपस्थित राहण्याची मुभा देण्यात आली आहे. त्याचबरोबर मतमोजणी दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाचे निरीक्षकही उपस्थित राहतील. महत्वाचं म्हणजे उमेदवारांनी फेरमतमोजणीची मागणी केल्यास फेरमतमोजणी करण्याचा निर्णय निवडणूक अधिकारी घेणार असल्याचं सांगितलं जातं आहे. एकंदरीतच हा कडक बंदोबस्त पाहता यंदा किमान मतमोजणीत काही गैरप्रकार होणार नाही हे नक्की!