मुंबई मध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे फोर्ट मध्ये एक आणि मालाड परिसरातील एक या इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. ह्या इमारतींमध्ये लोक सुद्धा रहात असल्यामुळे अनेक लोक मातीच्या ढिगाऱ्याखाली दाबले गेले असल्याचे सांगितले जात आहे, घटना स्थळावर अग्निशमन दलाचे जवान युद्धपातळीवर काम करत आहेत.
मालाड येथील घटनास्थळावरून आत्तापर्यंत ३ लोकांचे मृतदेह मिळाले आहेत, दुपारी २ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास मालाड येथील ही इमारत कोसळली तर संध्याकाळी फोर्ट येथील इमारत कोसळली आहे. घटनास्थळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुद्धा हजर झाले असून त्यांनी युद्धपातळीवर जखमी किंवा मृत लोक शोधण्याचे आदेश दिले आहेत.
मुंबईतील सखल भागात पावसामुळे पाणी जमा होत राहते, जमिनीमध्ये पाणी साचत राहिल्याने बिल्डिंगचा पाया म्हणजेच फाऊंडेशन आणि माती यांचा समतोल बिघडतो आणि अशातच पायाला तडे जाऊन उभी इमारत तिच्या स्वतःच्या वजनामुळे जमिनदोस्त होते. यामध्ये अतिशय जुन्या झालेल्या इमारतीना फार मोठा धोका असतो. दरम्यान घाटकोपर येथे सुद्धा भूस्खलन झाले असून सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही.