आज अर्थात १२ ऑक्टोबरला सकाळी १० वाजेच्या सुमारास मुंबईतील बऱ्याच ठिकाणी एकाचवेळी वीज पुरवठा खंडित झाला. पावर ग्रीड फेल्युअर मुळे एकाच वेळी बऱ्याच ठिकाणचा वीजपुरवठा खंडित झाल्याचे बेस्टने ट्विट करून कळवले. तसेच टाटा कंपनीकडून येणाऱ्या इलेक्ट्रिसिटी सप्लाय मध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे पावर ग्रीड फेल्युअर झाले असे असेही या ट्विटमध्ये सांगण्यात आले. मीडिया न्यूजनुसार केवळ टाटाच नाही तर महावितरण, अदाणी, बेस्ट अशा सर्वच विद्युत पुरावठादारांना पावर ग्रीड फेल्युअरचा फटका बसला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याशी या घटनेबद्दल चर्चा केली. मुंबईतील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्या अशी सूचना त्यांनी ऊर्जा मंत्र्यांना दिल्या. तसेच मनपा आयुक्त इकबाल सिंग चहल यांना रुग्णालयातील वीज पुरवठा अबाधित राहावा म्हणून पर्यायी व्यवस्था करावी अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी दिली.