यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दिवाळीत अनेक राज्यांमध्ये फटाके फोडण्यावर बंदी आहे. कोरोनासोबतच फटाक्यांमुळे वाढणारे प्रदूषण आणखी धोकादायक ठरू शकते या विचाराने फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारनेही या बाबीचा विचार करून फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन जनतेला केले आहे. तर मुंबई महापालिकेने मुंबईत फटाके फोडण्यास मनाई केली आहे. याबाबतचे परिपत्रक देखील मुंबई महापालिकेने जारी केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जनतेला संबोधित करतांना फटाक्यांचा वापर टाळण्याचे आवाहन केले.
या परिपत्रकात नमूद केल्यानुसार केवळ लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अर्थात १४ नोव्हेंबरला संध्याकाळी आपल्या घराच्या अथवा सोसायटीच्या अंगणात फुलझडी , अनार असे सौम्य प्रकारचे फटाके फोडण्यास परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय फटाके फोडतांनाही मास्कचा वापर, सोशल डिस्टंसिंग या नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. तसेच दवाखाने, हॉटेल्स, क्लब्स, जिमखाना अशा सार्वजनिक परिसरांत कुठेही फटाके फोडता येणार नाहीत. या नियमांचे पालन न करणाऱ्यावर महापालिका व पोलिसांद्वारे कारवाई करण्यात येईल. तसेच दिवाळीच्या दिवसांमध्ये नातेवाईकांकडे जाणे टाळावे असेही या परिपत्रकात सांगण्यात आले आहे.