Home महाराष्ट्र मुंबई लॉकडाऊन वाढवल्याने ठाण्यातील मुंब्रा येथे हजारो नागरिक रस्त्यावर!

लॉकडाऊन वाढवल्याने ठाण्यातील मुंब्रा येथे हजारो नागरिक रस्त्यावर!

0

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊनबाबतची घोषणा करुन देशातील नागरिकांना, “पुढील काही दिवस संयमाने आणि धिराने सांगितलेल्या सूचनांचे पालन करा” अशाप्रकारे आवाहन केले आहे. पंतप्रधानांच्या आवाहनानंतर रेल्वेनेसुद्धा ३ मेपर्यंत प्रवासी वाहतूक सेवा बंद करण्याची घोषणा केली आहे.

मात्र आता या लॉकडाऊनमुळे हजारो मजुरांचे हाल बेहाल होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. यातूनच मग मुंब्रा परिसरामध्ये देवरीपाडा येथे तसेच वांद्रे स्टेशन परिसरातही मोठ्या संख्येने मजूर एकत्र जमले. रोजंदारी आणि हातावर काम करणाऱ्या या मजुरांचे हाल होत असल्याने त्यांनी आक्रमक पवित्रा घेत आम्हाला घरी पाठवा अन्यथा पगार तरी द्या अशी मागणी करत रस्त्यावर जोरजोरात घोषणाबाजी सुरु केली.

मजुरांचा झालेला जमाव पाहून याठिकाणी पोलीस आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ३ मेपर्यंत देशात लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली त्यानंतर या मजुरांमध्ये एकच आक्रोश निर्माण झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून सरकारने हे पाऊल उचललं असलं तरी याच्यामुळे हातावर पोट असणाऱ्या कामगारांचे प्रचंड हाल झाले आहेत. या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे आम्ही कोरोनापेक्षा उपासमारीने मरू अशा शब्दात मजुरांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काही दिवसांपूर्वी लॉकडाऊनदरम्यान सुरतमध्येसुद्धा हातामध्ये काम नसल्यामुळे मजुरांनी दोन ठिकांनी दगडफेक आणि जाळपोळ केल्याची घटना घडली होती. सूरत येथील डायमंड बुर्समध्ये बांधकाम मजूर आणि लसकाणा येथे  सूतगिरणी कामगार रस्त्यावर उतरले. लॉकडाऊन सुरु राहिले, तर राहायचे कसे, असा सवाल करत एकतर काम सुरु करा किंवा घरी तरी जाऊ द्या, अशी मागणी या कामगारांनी या वेळी केली. यावेळी सूतगिरणी कामगारांनी भाजीपाल्याच्या पाच गाड्यांना आग लावली. तसेच रुग्णवाहिका आणि रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या गाड्यांची तोडफोड केली होती.