Home महाराष्ट्र “महाराष्ट्राचे सरकार पाडायची औकात कोणाच्याच बापाकडे नाही” : संजय राऊत

“महाराष्ट्राचे सरकार पाडायची औकात कोणाच्याच बापाकडे नाही” : संजय राऊत

0

 मध्य प्रदेश मध्ये राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर खोचक निशाणा साधला. गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात मध्य प्रदेशच्यानंतर महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस सुरु होणारच अशा आशयाच्या चर्चा आहेत. मात्र, कोणाच्याही बापात महाराष्ट्रातील सरकार पाडायची औकाद नाही, असे संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले आहे. ते शुक्रवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी त्यांनी आमदारांची फोडाफोडी करणाऱ्या भाजप नेत्यांना धारेवर घेतले. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी स्वत:हून राजीनामा दिला, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप अभिनंदन करतो.तसेच कोरोना महामारीच्या संकटावेळी राजकारण करू पाहणाऱ्या भाजप नेत्यांनाही राऊत यांनी चांगलेच फटकारले. कोरोनावरून राजकारण करत असलेल्या राज्यातील भाजप नेत्यांना ‘म्हाळगी प्रबोधिनीमध्ये’ क्वारंटाईन करावे, असा टोला त्यांनी लगावला.

कोरोनासारख्या संकटाच्या काळात नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान हवेत, असे आम्हीदेखील म्हणतो. ही राजकारण करण्याची वेळ अजिबात नाही. महाराष्ट्रात मतभेद विसरून काम करण्याची गरज आहे. मात्र, भाजपला जर राजकारणच करायचे असेल तर त्यांना विरोधी पक्षातही बसण्याचा अधिकार नाही, असे राऊत यांनी म्हटले. यावेळी त्यांनी माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या राज्यसभेवरील नियुक्तीविषयीही सुद्धा टीका केली. रंजन गोगोई आणि आमदारांना अशाप्रकारे प्रलोभने दाखवणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले.